Sunday, 10 June 2012

...विकसित भारत..आणि मी...


स्वामी विवेकानंदापासून ते डॉ. A. P. J. अब्दुल कलाम यांपर्यंत सर्व थोर
दृष्ट्या व्यक्तींनी भारत पुन्हा जगाला नवी दिशा देईल असे भाकीत केलेले आहे.
२०२० नंतर आपला देश विकसित होईल व जगातील महासत्ता बनेल. कारण त्यावेळी या
देशाची सर्वात मोठी संपत्ती असेल येथील तरुणांची प्रचंड संख्या! अर्थात हे तरुण सुशिक्षित व सुसंस्कृत असतीलच तरच ते राष्ट्रीय संपत्ती ठरतील अथवा ते राष्ट्रीय आपत्ती म्हणून समस्या ठरतील. त्यासाठी आज सर्वात जास्त आवश्यकता आहे ती गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारांची.

कित्येकांना देश विकसित होईल यावर विश्वासच बसत नाही व पुढचा प्रश्न असतो मी काय करू शकेलआपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे, असे अनेक वेळा आपल्याला वाटत असते. परंतु नेमके काय करावे आणि काय केले म्हणजे ती देशसेवा होईल हेच आपल्याला समजत नाही. काहीना मात्र यातील काहीच करावेसे वाटत नाही, ते देशासाठी ओझे असतात. तर काही देशासाठी काहीतरी करण्याच्या नुसत्या गप्पा मारतात, तर काही जण, 'एकट्याने करून काय होणार आहे?' अशा नकारात्मक मानसिकतेत गुरफटलेले असतात. प्रतिकुलतेच्या तक्रारीत रमणारी व्यक्तिमत्व डबक्यासारखी आहेत तिथेच राहतात; तर धबधबा थेट कड्यावरून उडी घेतो व पाण्याच्या प्रवाहाला वेग देतो, सर्वत्र सळसळतं चैतन्य निर्माण करतो. 'भारतात हे नाही -ते नाही' असे भारताला हिणवनाऱ्या व नेहमी नकारात्मक बोलणार्यांनी धमक असेल तर तो 'स्वप्नातील देश' इथेच निर्माण करून दाखवायला हवा. स्वतःपासून सुरुवात करायला हवी. इतरांची उदाहरणे व प्रेरणा शोधण्यापेक्षा स्वतःच एक आदर्श उदाहरण व प्रेरणा का बनू नये? माझ्यासाठी देश नव्हे,तर देशासाठी मी...असा विचार करावा.
'तरुणांच्या ओठांवर असलेली गाणी अन त्यांच्या आचरणाची कहाणी' त्या त्या देशाची महानता ठरवीत असते. कोणती गाणी आहेत तरुणांच्या ओठांवर? त्यांच्या देशाबद्दलचा विचार, त्यांचे आदर्श, त्यांच्या आस्था यावरूनच देशाचे भवितव्य घडणार आहे.
सध्या भारतीय संस्कृतीला मागास म्हणण्याची fashion आलीय आणि तथाकथित आधुनिक परकीय संस्कृतीचे अंधानुकरण करण्यात आपण धन्यता मानतोय.
राजकारणातून,प्रशासनातून कुणीतरी अवतार घेईल...आमच्यासाठी काहीतरी
करेल...कसेतरी आम्हाला यातून बाहेर काढेल...अशा आशेवर अनेकजण जगात असतात. हे परावलंबित्व सोडावे लागेल. 'कुणीतरी' नाही तर 'मी स्वतः','काही तरी' नाही तर
'निश्चित कार्य' आणि 'कसे तरी' नाही तर 'गुणवत्तेचा ध्यास' घेऊन स्वतःला झोकून
द्यावे लागेल.
आज देशासाठी 'मरण्याची' नव्हे 'करण्याची' गरज आहे. 'जे जे शक्य आहे' ते सर्वच
जण करतील, पण 'जे जे आवश्यक आहे' ते कोणी करावे? स्वतः, कुटुंब, गाव, समाज, प्रदेश, देश याच टप्प्यांनी बदल घडून येतो. स्वतःवर व बदलावर सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवूया. स्वतःपासून बदलाची सुरुवात करूया. ते अधिक सोपे व प्रभावी असते कारण ते आपल्याच हाती असते. इतरानाही याबाबत जागरूक करूया.